प्रतिनिधी : विष्णू जायभाये अहमदपूर तालुक्यातील रुध्दा येथे झालेल्या दुहेरी खुनाच्या धक्कादायक घटनेचा अहमदपूर पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत यशस्वीरित्या उलगडा केला आहे. पोलीस अधिक्षक अमोल तांबे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने दाखवलेल्या अचूक नियोजन, वेग, समन्वय आणि तांत्रिक तपासाच्या बळावर हा गुंतागुंतीचा गुन्हा तत्काळ उघडकीस आणला, जो जिल्हा तसेच अहमदपूर पोलिसांच्या व्यावसायिक क्षमतेचे उत्तम उदाहरण ठरला आहे.या संपूर्ण घटनेची माहीती अति पोलीस अधिक्षक मंगेश चव्हाण यांनी पोलीस स्टेशन अहमदपूर येथे पत्रकार परिषद घेऊन दिली
दिनांक ०३/११/२०२५ रोजी रात्री मौजे रुध्दा येथे शिवराज निवृत्ती सुरनर (वय ७०) आणि त्यांचा मुलगा विश्वनाथ शिवराज सुरनर (वय १९) हे दोघे शेतातील झोपडीत झोपले असताना त्यांची हत्या झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी, मृतांच्या मुलीस ही धक्कादायक माहिती मिळाली.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अमोल तांबे पोलीस अधिक्षक, लातूर यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.त्यांच्या सूचनेनुसार, तपास कार्याला गती देण्यात येऊन मंगेश चव्हाण (अति. पोलीस अधिक्षक) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या अधिनस्त स्थानिक गुन्हे शाखेची ३ आणि अहमदपूर पोलीस ठाण्याची २ अशी एकूण ५ तपास पथके तातडीने कार्यान्वित करण्यात आली. तसेच डॉग स्कॉड, फिंगर प्रिंट तज्ञ आणि फॉरेन्सीक तज्ञ यांना पाचारण करून आवश्यक पुरावे गोळा करण्यात आले.
१२ तासांत आरोपी जेरबंद : –
पोलीस पथकांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल सीडीआर विश्लेषण आणि गोपनिय माहितीच्या आधारे अचूक आणि समन्वित कारवाई केली. या प्रभावी नेतृत्वामुळे आणि तांत्रिक तपासाच्या बळावर, अवघ्या १२ तासांचे आत गुन्ह्यातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे
नरसिंग भाऊराव शिंदे (वय ६०)
केरबा नरसिंग शिंदे (वय २१) (दोघे रा. रुधा, ह.मू. करेवाडी ता. लोहा जि. नांदेड) ही आहेत
खुनामागचे धक्कादायक कारण
तपासादरम्यान, आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मयत शिवराज सुरनर यांच्या नावे शेती करून दिली होती. मात्र अलीकडील काळात त्यांनी तीच शेती पुन्हा स्वतःच्या नावे करून देण्याची मागणी केली. मृतकांनी या मागणीस नकार दिल्याने आरोपींनी रागाच्या भरात खुनाचा कट रचला.
दिनांक ०३/११/२०२५ च्या रात्री आरोपींनी झोपडीजवळ दबा धरून बसून हातातील शस्त्राने बाप-लेकावर प्राणघातक हल्ला केला, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी पुरावे मिटवण्यासाठी मृतदेह ओढून शेताजवळ आणले व त्यांच्यावर दुचाकी टाकून अपघाताचा बनाव करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता.
पोलीस पथकाचे विशेष कौतुक
या महत्त्वपूर्ण गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलीस अधिक्षक अमोल तांबे, अप्पर पोलीस अधिक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांचे नेतृत्व निर्णायक ठरले.
तपास पथकातील पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष केदासे, पोलीस उपनिरीक्षक स्मीता जाधव, पोनि सुधाकर बावकर (स्थागुशा) पोउपनि रवि बुरकुले, आनंद श्रीमंगल यांच्यासह तपास पथकातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जसे की तानाजी आरदवाड, हरी कांबळवाड, विशाल सारोळे, मारोती शिंदे, बाळू पांचाळ, पोनि रायटर हनुमंत आरदवाड, दिंडगे वैजेनाथ, बबन चपडे आदी दक्षता, समन्वय आणि धैर्य दाखवत अल्पावधीत हे प्रकरण उघडकीस आणले, जे खरोखरच प्रशंसनीय आहे.
अहमदपूर पोलिसांनी या प्रकरणात दाखवलेली कार्यक्षमता आणि तत्परता हे नागरिकांच्या सुरक्षेसाठी लातूर पोलीस सदैव दक्ष व तत्पर आहेत हे अधोरेखित करते.
पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार हे करीत आहेत.

